Thursday, March 1, 2018

Crowdfunding

क्राऊडफंडिंग समजून घ्या आणि उभा करा स्वत:चा व्यवसाय
भारतात अद्याप पूर्णपणे मान्यता नसलेला, पण युवा उद्योजकांमध्ये प्रचलित होत असलेला हा प्रकार आहे. एंजल इन्व्हेस्टर, व्हेंचर कॅपिटलिस्ट यांच्याकडून फंडिंग मिळवताना स्टार्टअप्सना अनेक अटींची पूर्तता करावी लागते आणि त्यामुळे त्यांच्याकडून फंडिंग मिळवणे हे प्रत्येक स्टार्टअपला शक्य होत नाही, तर अनेक वेळा स्टार्टअप्सना, ओळखी नसल्याने या मोठ्या गुंतवणूकदारापर्यंत योग्य मार्गाने पोहोचता येत नाही.
तसेच या खासगी गुंतवणूकदारांचा कलदेखील शक्यतो सॉफ्टवेअर डेव्हलपर, प्रोग्रामर असलेल्या संस्थापकांनी सुरू केलेल्या किंवा बर्‍यापैकी ग्राहक असणार्‍या ई-कॉमर्स अथवा टेक्नो स्टार्टअप्सकडे जास्त असतो. त्यामुळे या मोठ्या प्रक्रियेला टाळून थेट संभाव्य ग्राहकांकडून अथवा वैयक्तिक स्वरूपात छोट्या प्रमाणावर गुंतवणूक करणार्‍या व्यक्तींकडून भांडवलाची उभारणी करण्याची संधी देणार्‍या क्राऊडफंडिंगला आज अनेक स्टार्टअप्स प्राधान्य देत आहेत.
तुमच्या स्टार्टअपबद्दल माहिती देणारा व्हिडीओ, तुमची आणि तुमच्या प्रॉडक्टच्या संकल्पनेची संपूर्ण माहिती इंटरनेटवर प्रसिद्ध केली जाते आणि प्रॉडक्टचं व्यावसायिक उत्पादन करण्यापूर्वीच ते हजारो लोकांना विकून तुमच्या स्टार्टअपसाठी भांडवल उभं केलं जातं. क्राऊडफंडिंग संकल्पनेमुळे आज अशा प्रकारे भांडवलाची उभारणी करणे सहज शक्य झाले आहे.
किकस्टार्टर, इंडीगोगो, पिक वेंचर यांसारख्या अनेक वेबसाइट फक्त क्राऊड फंडिंगसाठी सुरू झाल्या आहेत. जगभरात अशा प्रकारच्या ४५० हून जास्त वेबसाइट आहेत. भारतात ही संख्या सुमारे पंधरा इतकी आहे.
क्राऊड फंडिंगचे प्रकार
१ इक्विटी (भागभांडवल) : या प्रकारात, कंपनीच्या भागभांडवलाच्या मोबदल्यात छोट्या गुंतवणूकदारांकडून भांडवलाची उभारणी केली जाते. प्रामुख्याने स्टार्टअप्स याचा वापर करतात.
२ डोनेशन (आर्थिक सहकार्य) : या प्रकारात लोकांकडून प्रामुख्याने सामाजिक अथवा वैयक्तिक उपयोगासाठीसुद्धा (उदा: शिक्षण, वैद्यकीय उपचार किंवा विशिष्ट कामासाठी आर्थिक सहकार्य) पैसे जमवले जातात. पैसे देणार्‍यांना यातून थेट आर्थिक मोबदला मिळत नाही.
३. लेंडिंग/डेब्ट (कर्ज) : यामध्ये कोणत्याही प्रकारच्या उपयोगासाठी कर्जाच्या स्वरूपात पैसे जमवले जातात. हे पैसे निर्धारित व्याजदराने आधीच ठरलेल्या अटींप्रमाणे परत केले जातात. ‘रंग दे’ ही संस्था त्यांच्या वेबसाइटच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब उद्योजकांना छोटे उद्योग, स्वयंरोजगार यासाठी अशा प्रकारच्या क्राउडफंडिंगमधून मदत करत आहे.
४ रिवॉर्ड (मोबदला अथवा विक्री) : यामध्ये गुंतवणूकदारांना ते किती गुंतवणूक करत आहे त्यानुसार निश्चित मोबदला देण्यात येतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे रोटीमॅटिक या उत्पादनाची पूर्वविक्री. स्टार्टअप्स या प्रकारचा सर्वात जास्त वापर करतात.
छोट्या गुंतवणूकदाराची फसवणूक होऊ नये आणि या क्षेत्रातून होत असलेल्या गुंतवणुकीचे कायदेशीर नियमन व्हावे यासाठी भारतानेसुद्धा सेबीच्या माध्यमातून यासाठी मार्गदर्शक नियमावली बनवण्यास सुरुवात केली आहे.
‘सेबी’ने घालून दिलेली क्राऊड फंडिंग संदर्भातील काही मार्गदर्शक तत्त्वे :
वेबसाइट अथवा सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या सामाजिक कामासाठी, व्यवसाय-उद्योगासाठी, प्रोजेक्टसाठी छोट्या गुंतवणूकदारांच्या माध्यमातून आर्थिक भांडवलाची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला क्राऊड फंडिंग मानण्यात येईल.
कंपनीची भारतात अधिकृत नोंदणी झालेली असावी, मात्र शेअर मार्केटमध्ये नोंद झालेली नसावी. क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून कंपनीला १० करोडपेक्षा जास्त भांडवलाची उभारणी करता येणार नाही.
भांडवलाची उभारणी करताना एका आर्थिक वर्षात दोनशेपेक्षा जास्त गुंतवणूकदार घेता येणार नाही.
क्राऊडफंडिंगच्या माध्यमातून भांडवलाची उभारणी करत असल्याबद्दल, जाहीररीत्या कोणत्याही प्रकारची जाहिरात करता येणार नाही. सोशल मीडियावर जाहिरात करण्यासदेखील मनाई असेल.
इक्विटी क्राऊड फंडिंग आणि डेब्ट (कर्ज) क्राउडफंडिंगच्या माध्यमातून गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांकडे कंपनी नियमांप्रमाणे अनुक्रमे इक्विटी शेअर होल्डर आणि डेबेंचर होल्डरचे संबंधित अधिकार असतील.
– कुणाल गडहिरे
9870869651

Source- https://wp.me/p4g3S9-1Gy